आजी गेली

22 04 2021

आज पहाटे आजी गेली. वाईट तर वाटेलाच नं. पण नक्की का बरं? नागपूर सोडून २२ वर्षे झालीत. वर्षातून साधारणपणे एक चक्कर नागपूरची. ती का बरं? आई बाबांना भेटायला, काका-काकू आणि चुलत आणि आत्ते भावंडान सोबत पत्ते खेळायला, मित्रांना भेटायला आणि पाणी पुरी खायला.आणि आजी? आजी तर होतीच. पार्श्वभूमीत. साबुदाण्याची खिचडी बनवायला नाही तर स्वयंपाक घरात काही तरी काम करत. नं कधी बाहेर जात, न कधी बाहेरचा खात, न कधी पत्ते किंवा carrom खेळत.

पण होती खास हे माहित होतं. सुनांना म्हणजे माझी आई आणि माझ्या २ काकू, यांना तिची अजूनही भिती होती असं त्या म्हणायच्या. तिचे पोरं म्हणजे माझे बाबा, काका आणि आत्या, यांना तिचा धाक होता. पण तिच्या १० पैकी एक सुद्धा नातवंडांना विचारा – मिळालं ते फक्त प्रेम आणि स्वीकृती, आपुलकी आणि लाड, शिरा आणि कच्चा चिवडा.

तिचं चरित्रं कोणी लिहिणार नाही पण तिच्या गाथा तुम्ही ऐकाल. नातेवाईकांसोबत वाढलेली अनाथ मुलगी, ५ मुलं, ५ सुना-जावई. १० नातवंडं. १५ पणतू आणि पणत्या. सदैव निरोगी. सदैव सशक्त. सक्रिय. नव्वदीत सुद्धा कार्यक्षम. अगदी स्वछंदी आयुष्य. मरण आलं ते सुद्धा मुलाच्या घरात. रात्री झोपेत. कोणाला त्रास न देता.

डोळ्यात अश्रू येतात. तिच्या आठवणी येतात. तिचा मोडकं इंग्रजीतलं “थांकू” आठवतं आणि थोडं हसूस पण येतं. पण “आजी गेली,” याचं गाम्भीर्य इथे ८००० किलोमीटर दूर बसून येत नाही. ते नागपूरला पुढच्या वेळेस गेल्यावरच कळेल. मित्र असतील, नातेवाईक असतील, पाणी पुरीचा ठेला असेल पण पार्श्वभूमीच्या असलेली आजी…


Actions

Information

One response

23 04 2021
Harshavardhan Patil

हे असच असतं, जे जातं तेव्हा त्याला किंमत येते. आयुष्याच्या या टप्प्यावर जरा जरा अक्कल येते आणि आयुष्याची वाळू हळू हळू निसटून जाऊ लागते. मन सैरभैर होतं तेव्हा अशा आजीच आपल्याला रस्ता दाखवतात आणि धीर देतात. आज्या फार बोलत का नाही हे कळेकळेपर्यंत आपणच अबोल होऊन या जगाचा पसारा बघायला, समजायला शिकतो. आजी जशी शांततेत गेली हीच पुण्याई कमवता आली आपल्याला तरच जीवनाचं सार्थक झालं असं मला नेहमी वाटतं. मरण असं शांत यावं. जातांना तडफड आणि दुःख होऊ नये, निर्लेपपणे निरोप घेता यावा. 🙏🏼

Leave a comment